महाबळेश्वर : वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पालिकेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांमध्ये खळबळ माजली आहे.
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यालगत वेण्णा लेक ते लिंगमळा यादरम्यान वेण्णा नदी वाहते. नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्याने या ठिकाणी नदीपात्र लहान आहे. जसजशी ही नदी पुढे जाते, तसतसे नदीपात्र रुंद होत जाते. वेण्णा लेक ते लिंगमळा यादरम्यान नदीपात्रात अनेक मिळकत धारकांनी अतिक्रमण करून तेथे विनापरवाना बांधकामे केली आहेत. या ठिकाणी अनेकांनी लाॅज, हाॅटेल, ढाबे व रेस्टाॅरंट सुरू केले आहेत. नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम केल्याने येथील पर्यावरणाची खूप हानी झाली आहे.
यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नदीपात्रातील बांधकामांकडे कायम दुर्लक्ष केल्याने येथील विनापरवाना बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालिकेत नव्याने आलेल्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नदीपात्राची पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने पाटबंधारे विभागाकडे रक्कम भरली आहे. तसेच विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा पाठवून विनापरवाना बांधकामे काढून घेण्यास कळविले आहे. पालिकेने शांताराम गणपत बावळेकर व अस्लम कासम नालबंद यांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या दोघांनीही पालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी बावळेकर व नालबंद यांच्या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने वेण्णा नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी शांताराम बावळेकर व अस्लम नालबंद यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी नदीपात्रातील बांधकामाबाबत घेतलेल्या निर्णयाने नदीपात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या मिळकत धारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुन्हा दाखल झाल्याने आता या दोन बांधकामांबाबत पालिका कोणता निर्णय घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.