सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) याच्यावर ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोनोग्राफीसह विविध मशीनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले.याबाबत अधिक माहिती अशी, सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीनचे रजिस्ट्रेशन तसेच हॉस्पीटल परवाना नुतनीकरणासाठी वाई येथील मिशन हॉस्पीटलमधील फाईल सिव्हिल हॉस्पीटलमध्ये येऊन बरेच दिवस झाले होते. मात्र, वरिष्ठांच्या सहिसाठी ही फाईल पुढे काही सरकत नव्हती. संबंधित तक्रारदार रोज सिव्हिलमध्ये हेलपाटे मारत होता. मात्र, त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.
लिपिक अमित राजे याने तक्रारदाराकडे या कामाच्या मोबदल्यात ४० हजारांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचतप विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अमित राजेला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, त्याला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही.
परंतु लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी लाचलुचपतची टीम जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याने तेथून पलायन केले. पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरीफा मुल्ला, अजित कर्णे आदींनी ही कारवाई केली.