मेढा : जावळी तालुक्यातील म्हसवे येथे फलटण येथून आलेल्या सहलीतील विद्यार्थी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११, रा अलगुडेवाडी, ता.फलटण) याच्या डोक्यात वडाच्या झाडाची फांदी पडून मृत्यू झाल्याप्रकरणी ३ महिला शिक्षक व १ पुरुष शिक्षक यांच्याविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फलटण येथील कमला निंबकर बालभवन प्रगत शिक्षण संस्थेच्या शाळेतील ५ वीच्या विद्यार्थ्यांची सहल गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हसवे येथे आली होती. या सहलीच्या नियोजनात म्हसवे गाव नव्हते. तरीही शिक्षकांनी या गावी सहल नेली. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड हा विद्यार्थी वडाच्या पारंब्यांना लोंबकळत असताना झाडाची फांदी तुटून त्याच्या डोक्यात पडली. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहलीचे नियोजन नसताना व विद्यार्थ्यांची जबाबदारी असताना निष्काळजीपणा केला व काळजी घेतली नाही म्हणून या शाळेचे शिक्षक विशाल मारुती मोहिते (वय ३८), अरुणा मनोहर शेवाळे (वय ५६), नीता नरेश सस्ते (वय ४३), उज्वला संजय निंबाळकर (सर्व रा फलटण, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील हे करत आहेत.
चिखलात दुचाकी घसरुन युवक ठार सातारा : पाऊस पडल्याने रस्त्यावर चिखल साठल्याने दुचाकी घसरुन समोरील झाडावर जाऊन जोरदार आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नीलेश भिमराव वाघ (वय ३२, रा. नांदगिरी, ता.कोरेगांव) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता पाडळी गावच्या हद्दीत झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश वाघ हा दुचाकीवरुन भुईंज येथून दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान नांदगिरीला जाण्यासाठी निघाला होता. यावेळी तुरळक पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर चिखल साठला होता. सातारा ते सातारारोड या रस्त्यावर पाडळी गावच्या हद्दीत नदीच्या वळणावर तो पोहोचल्यानंतर त्याची दुचाकी चिखलात घसरली. रस्त्याकडेला असलेल्या झाडावर दुचाकी जोरदार जाऊन आदळली. त्यामध्ये नीलेशच्या डोक्याला जोरदार मार लागून तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यावर हेल्मेट असते तर त्याचा जीव या वाचला असता, असे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
शेंद्रे येथे जुगार अड्डयावर छापा सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथे जुगार खेळताना पांडुरंग खाशाबा माने (रा. वळसे, ता. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच ठिकाणी मटका खेळताना ऋषिकेश भागवत महाकुंडे आणि मच्छिंद्र मानसिंग शिंदे (दोघे रा. शेंद्रे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा ४ हजार ८२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.