सातारा : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असताना रस्त्यावर गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणार्या बर्थ डे बॉय आणि त्याच्या मित्रांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मंगेश मधुकर देवकर (१८, रा. गुरुवार पेठ सातारा) हा बर्थडे बॉय व त्याचे साथीदार गुंड्या कांबळे (१९, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) व अजिंक्य देशमुख (रा. गोडोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शाहुपूरी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल सातारा याठिकाणी काही मुले जमाव करून वाढदिवस साजरा करीत असल्याची माहिती पोलिसांना वायरलेसवरून मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन खात्री केली असता काही मुले सार्वजनिक ठिकाणी जमाव करून वाढदिवस साजरा करीत असल्याचे दिसले. पोलिसांची गाडी बघून जमलेली मुले पसार झाली. त्याठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असता बर्थडे बॉय मंगेश मधुकर देवकर याच्यासमवेत गुंड्या कांबळे, अजिंक्य देशमुख व इतर पाच ते सहा मुले असे असल्याचे सांगितले. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र कोविड १९ अधिनियमनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.