सातारा : गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दोन तरुण तळीरामांवर शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. बाबूराव जांगळे आणि रमेश जांगळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. असे असतानाही शुक्रवार, दि. २३ रोजी समर्थ मंदिर ते फुटका तलाव रस्त्यावर असलेल्या दैवज्ञ मंगल कार्यालयासमोर कोणीतरी दारूच्या नशेत आरडाओरड करत सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गस्त पथकातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांना बाबूराव धोंडिबा जांगळे (वय २६), रमेश धोंडिबा जांगळे (वय २२, रा. दोघेही रा. मंगळवार पेठ, श्रीराम अपार्टमेंट, सातारा) हे दारूच्या नशेत आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. या दोघांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक जी. एन. घोडके हे करत आहेत.