सातारा : येथील राजलक्ष्मी थिएटरसमोर दोन गटांत तुंबळ मारामारी करणाऱ्या युवकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी संबंधित युवकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतेचा भंग केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला.सोहेल निसार बागवान (वय २९), साजिद निसार बागवान (वय ३२), मोहसीन निसार बागवान (सर्व रा. समता पार्क, शाहूपुरी सातारा), आरबाज नईम शेख (वय २८, रा. गुरुवार पेठ, सातारा), हर्षद नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, राजलक्ष्मी थिएटरसमोर बुधवारी सायंकाळी पाच वाजता युवकांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी सुरू होती.
लाकडी दांडक्याने एकमेकांना मारहाण करण्यात येत होती. यावेळी वाहतूक पोलीस सोमनाथ शिंदे हे तेथून जात असताना त्यांच्या हा प्रकार निर्दशनास आला. त्यांनी संबंधित युवकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शिंदे यांनी शर्तीचे प्रयत्न करून एकट्याने तिघांना ताब्यात घेतले. मात्र, काहीजण पळून गेले. भर रस्त्यातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.दोन्ही गटांतील युवक एकमेकांच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव संबंधित युवकांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा लागला.