सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सातारा शहरालगत असणारे गोडोली येथील पी. डी. वाईन शॉप उघडे ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश उदासी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सोमवार, दि. २४ रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सुरेश गुरमुखदास उदासी (वय ५७, रा. गोळीबार मैदान, सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीत दारु पार्सल अथवा घरपोहोच देणे बंधनकारक असताना उदासी यांनी पी. डी. वाईन शॉप हे दुकान चालू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.