वेळे : वाई तालुक्यातील गुळूब येथे ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुखांची जेसीबीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विरोधकांच्या घरापुढे फटाके फोडण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित पॅनल प्रमुखासह विजयी उमेदवार विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गुळूब येथील ग्रामविकास ऐक्य पॅनलमधून अनिकेत अंकुश जाधव, विमल धर्माजी जाधव, स्वाती शिवाजी माने, सचिन दादासाहेब यादव, रेश्मा दिलीप पवार, कल्पना राजेंद्र यादव या विजयी उमेदवारांसह पॅनलप्रमुख महादेव जगनाथ मस्कर (रा. मयुरेश्वर), अंकुश रामचंद्र जाधव, रवींद्र रामचंद्र जाधव, राजेंद्र महादेव यादव यांच्यासह सर्व पॅनल समर्थकांनी सोमवारी दुपारी बारा ते दीडच्या सुमारास गुळूबमधून जेसीबीमधून विजयी मिरवणूक काढली. यावेळी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक सुरू असताना विरोधी भैरवनाथ ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख गणेश एकनाथ जाधव (रा. गुळूब) यांच्या घरासमोर अंगणात गुलाल टाकून फटाक्यांची आतषबाजी केली.
याबाबतची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात गणेश जाधव यांनी दाखल केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी भैरवनाथ पॅनल प्रमुख प्रताप ज्ञानेश्वर यादव, किसन एकनाथ यादव, सागर विश्वास जाधव, गोविंद बबन यादव, संतोष धर्माजी यादव, कृष्णा मानसिंग यादव, रवींद्र मारूती जाधव, प्रताप श्रीपती यादव या सर्वांनी वाई तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन दिले. त्यानंतर भुईंज पोलिसांनी रात्री उशिरा संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.