सातारा : कोरोना महामारीत देशी दारू दुकानदारांना फक्त घरपोहोच पार्सल सुविधा देणे बंधनकारक असताना, कोडोली येथील धनगरवाडी परिसरात असणाऱ्या एका देशी दारू दुकानात गर्दी करून दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर आणि दुकानात गर्दी केल्याप्रकरणी आठजण अशा नऊजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या नऊजणांमध्ये चौघे अनोळखी असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत कोडोली येथील धनगरवाडी परिसरात असणाऱ्या देशी दारू दुकानात सौरभ राहुल थोरात (वय २२, रा. अमरलक्ष्मी, कोडोली) हा गर्दी जमवून दारू विक्री करत होता. याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळताच पोलीस येथे तत्काळ दाखल झाले होते. यावेळी सौरभ थोरात हा देशी दारू दुकानात लोकांची गर्दी करून त्यांना दारूक्री करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना येथे देवा उत्तम सुतार (वय ४०, रा. देगावफाटा, जाधव हॉस्पिटल, गोडाली, सातारा), अनिल अंबादास पवार (२७, रा. कर्मवीरनगर, संभाजीनगर, बसस्टॉपशेजारी, ता. सातारा), पप्पू शिवाजी भोसले (४0, रा. दत्तनगर, कोडोली, सातारा), नीलेश विनायक कांबळे (३१, रा. जैतापूर, पो. चिंचणेर, ता. सातारा) तसेच अन्य चौघेजण तेथे आढळून आले. या सर्वांवर पोलिसांना गुन्हा दाखल केला. सातारा शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संतोष कचरे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.