सातारा : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना केअर सेंटर तसेच विविध आरोग्य केंद्रात वैद्यकीय स्टाफ भरण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना आरोग्य सेवा देणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित असतानाही गृहविलगीकरणातील कोणी घराबाहेर पडले तर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हाच दाखल करावा,’ असा एकप्रकारे इशाराच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष कबुले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते आदी उपस्थित होते.
अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, ‘जिल्ह्यात कोरोनाची स्थिती वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करणे महत्त्वाचे होते. त्यासाठी नवीन स्टाफ भरण्यात आला आहे. जिल्ह्यातील कवठे, वडूथ, क्षेत्र माहुली, पुसेगाव आणि वडगाव हवेली येथील आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना जवळ सोय होऊ शकते. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने इन्सेनिटर खरेदीची प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार राबविलेली आहे. तीनवेळी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. तरीही याबाबत चौकशी समिती नेमून पडताळणी केली जाईल. त्यानंतरच बिल काढण्यात येईल.’
चौकट :
जिल्ह्यात पाच हजार रेमडेसिविर इंजेक्शन...
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. दोन दिवसांत कोरोना लसीचे ७४ हजार डोस मिळाले आहेत, तर आणखी १९ हजार डोस मिळणार आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहीम आणखी वेग घेईल. त्याचबरोबर रेमडेसिविरची पाच हजार इंजेक्शन्स १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात पोहोचतील. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणे आणखी शक्य होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
.........................................................