कऱ्हाड : ‘राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आजच्या सरकारकडून योग्य हमीभाव दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. याला सर्वस्वी आजचे सरकारच जबाबदार आहे. आज राज्यात निसर्गाच्या चुकीमुळे दुष्काळाचे संकट निर्माण झाले असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, ते निर्सगाच्या चुकीमुळे निर्माण झाले नसून राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाले आहे. हे संकट अस्मानी नसून ते सुलतानी आहे,’ अशी टीका माजी सहकारमंत्री एन. डी. पाटील यांनी केली. येथील वेणुताई चव्हाण सभागृहात बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शिरोळचे आमदार उल्हास पवार, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील-कवेकर, बळीराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, प्रदेशाध्यक्ष सत्तारभाई पटेल, प्रवक्ते संजय पाटील-घाटणेकर, राज्य युवा कार्याध्यक्ष नितीन पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.माजी सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘आजच्या राज्यकर्त्यांमध्ये व मागील सत्ता भोगलेल्या राज्यकर्त्यांमध्ये काहीच फरक नाही. या दोन्हींही राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे पंजाबमधील शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या आहेत. त्याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला तेथील सरकारने योग्य हमीभाव दिला नाही. मोठ्या प्रमाणात शेतीमालाचा उत्पादन घेऊनही योग्य हमीभाव मिळाला नसल्याने तेथील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. तेथील शेतकऱ्यांवरील संकट हे आस्मानी नव्हते. तर ते राज्यकर्त्यांनी आणले होते. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याबाबतीत घडलेली आहे. शेतकऱ्यांच्या ऊसास योग्य दर न देता साखरेच्या किमती वाढविण्याचे काम राज्यकर्त्यांनीच केले आहे. आता तर यांनी डाळींच्याही किमती वाढवल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दिल्या जाणाऱ्या हमीभावाच्या प्रश्नांबाबत आजच्या सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांच्याकडून मागील सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नुसती आश्वासनेच देण्याचे काम केले जात आहे. आजच्या सरकारने शेतीमालाचा उत्पादनाचा खर्च हा प्रमाणिकपणे काढलेला नसून, तो लबाडीने काढला आहे,’ अशी टीका पाटील यांनी केली.माजी आमदार पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या काळात बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विचाराला चालना देण्याचे काम केले. आमचे भांडण हे कुठल्या जाती, पक्षाबरोबर नसून आमचे भांडण सरकारच्या धोरणांविरोधात आहे. शेतकऱ्यांपुढचे सर्वात मोठे संकट हे निसर्ग नसून आजचे सरकार आहे. ज्या राजकीय पुढाऱ्यांना यांनी निवडून दिले, त्यांनीच यांची साथ आज सोडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.’ (प्रतिनिधी)फडणवीस सरकारच्या धोरणाचा निषेध..चालूवर्षीच्या गळीत हंगामास जाणाऱ्या उसाचा भाव तोडणी वाहतूक वजा करून प्रतिटन ३ हजार ५०० रुपये भाव मिळावा, उत्पादन खर्चावर आधारित सर्व शेतीमालास आधारभूत किमती मिळाल्या पाहिजे, अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांवरील संकट अस्मानी नसून सुलतानी
By admin | Published: October 26, 2015 11:10 PM