कऱ्हाड तालुक्यातील दक्षिण विभागात बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पूर्व विभागातही हीच परिस्थिती असून या दोन्ही विभागातील शेतकरी उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागती करतात. या मशागतीसाठी बैलांचा वापर केला जातो. मात्र, सध्या जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे बैल मिळणे मुश्किल झाले आहे. परिणामी, पेरणीपूर्व मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातही हीच स्थिती आहे. या विभागात डोंगर उतारावरील शेतीला पारंपरिक पद्धतीशिवाय पर्याय नाही. ट्रॅक्टरसारखी वाहने अडचणींच्या ठिकाणी किंवा बांधावरून घेऊन जाणे धोक्याचे ठरते. त्यामुळे डोंगर उतारावरील शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी पारंपरिक बैलांच्या साहाय्याने शेती करतो. खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीसाठी बैल खरेदी करायचे. खरीपपूर्व मशागत, पेरणी व अंतर्गत मशागतीची कामे झाली की, कमी-जास्त करून या बैलांची विक्री करायची, अशी पद्धत याठिकाणी आहे. मात्र, बाजारच बंद असल्याने बैल खरेदी करता न आल्याने खरीपपूर्व मशागत व खरिपाच्या पेरणीचे संकट उभे आहे.
काही शेतकरी मशागतीसाठी आधुनिक रोटावेटर ट्रॅक्टरचा वापर करीत असले तरी, त्या ट्रॅक्टरद्वारे अपेक्षित मशागत होत नसल्याचे काही शेतकऱ्यांचे मत आहे. तसेच अंतर्गत मशागतीलाही या ट्रॅक्टरचा उपयोग होत नाही. डोंगर उतारावरील शेतीत हा ट्रॅक्टर नेता येत नाही. त्यामुळे बैलांशिवाय पर्याय नाही. मात्र, बाजारच बंद असल्यामुळे बैल आणायचे कोठून, हा प्रश्न आहे.
- चौकट
पैरा पद्धतीने मशागत
डोंगरी विभागातील काही शेतकऱ्यांकडे बैल उपलब्ध आहेत. असे शेतकरी पैरा पद्धतीने एकमेकाच्या शेतीची मशागत करीत आहेत. सध्या अशा शेतकऱ्यांकडे इतर शेतकरी मशागतीसाठी विनवणी करताना दिसून येत आहेत. भाडे घेऊन अथवा पैरा पद्धतीने मशागत करू, अशी विनवणी ते करीत आहेत.