लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड काळात कुटुंबात उद्भवलेले ताण, समवयस्कांपासून दूर राहिल्याने तुटलेला संवाद, ऑनलाईन अभ्यासाने हाती आलेल्या मोबाईलमधून गेमिंगचा पडलेला विळखा, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘ अभ्यास विस्मृती’चा त्रास जाणवू लागला आहे. या मानसिक अस्वस्थतेमुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणंही कठीण होऊन बसलं आहे.
कोविड काळ संपून आयुष्य न्यू नॉर्मल होत असतानाच, आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. या वर्गांमध्ये मुलांनी शरीराने हजेरी लावली असली, तरीही देहाने अद्यापही इतर विश्वातच रममाण आहेत. वर्गात अभ्यास समजून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकाग्रतेचा अभाव कोविडपश्चात अधिक दिसल्याचं शिक्षक सांगत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सोशल कनेक्ट संपुष्टात आल्याने मुलं एकलकोंडी झाल्याच्या तक्रारी पालकांकडून मनोविकारतज्ज्ञांकडे आल्या आहेत. मानसशास्त्रीय भाषेत त्याला ‘एन्झायटी’ असंही संबोधले जाते. लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांनी टोकाचे कलह अनुभवले. मोठ्यांच्यातील या वादाने चिमुकल्यांना हादरवून सोडले. जगात सर्वत्र न्यू नॉर्मल होत असलं, तरीही छोट्यांच्या विश्वात झालेली उलथापालथ अद्यापही शमली नाही. यातून बाहेर कसं पडावं, कोणाशी याविषयी बोलावं, या सर्वचबाबत त्यांचा झालेला कोंडमारा अव्यक्त राहिला. दिवसभर कामाच्या धबडग्यात मोठे नॉर्मल झाले असले, तरीही चिमुकल्यांच्या विश्वात अद्यापही आत्मिक द्वंद्व सुरूच आहे. याचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक करिअरवर होणार आहे. पालकांनीही याचा विचार करून यंदा फार मोठ्या गुणांची अपेक्षा मुलांकडून करू नये, असं तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
एन्झायटी डिप्रेशन वाढलं!
एन्झायटीकडे दुर्लक्ष केलं, तर ही स्थिती एन्झायटी अॅटककडे नेऊ शकते. यामध्ये मुलांमध्ये कायम भयाची भावना मनात राहते. काहीतरी वाईट किंवा चुकीचंच होणार, अशी त्यांची धारणा होते. वारंवार याच विचारात असणाऱ्या मुलांना आपल्या भावनांवरही नियंत्रण मिळवणं अनेकदा अवघड होऊन बसते. एन्झायटी अॅटकमध्ये व्यक्तीला सतत चिंता, भीती आणि अस्वस्थता जाणवते. हृदयाचे ठोके वाढतात आणि श्वास भरून येतो.
संवादाची पध्दती बदलणं आवश्यक!
कोविड काळात मानसिक कसोट्यांवर मोठ्यांचा जिथं टिकाव लागला नाही, तिथं छोट्यांची तर गोेष्टच वेगळी आहे. कौटुंबिक अस्थिरता, वैयक्तिक एकटेपण, शैक्षणिक गॅप आणि ऑनलाईन अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांच्या विश्वात उलथापालथ केली.
कोट :
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या भावनांचा निचरा झाला नाही. परिणामी एन्झायटी डिप्रेशनच्या त्रासाला मुलांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मुलांशी वेगळ्या पध्दतीने संवाद साधणं आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक आहे.
डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ