खंडाळा : कोरोनाच्या संसर्गाने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. खंडाळा शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाणी कमी झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
खंडाळा तालुक्यात प्रत्येकवर्षी एप्रिल, मे व जून महिन्यांत काही गावांतील नागरिकांना टंचाईच्या झळांना तोंड द्यावे लागते. मात्र यावर्षी दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील गावात पाणीटंचाई अद्याप तरी जाणवू लागलेली नाही. मात्र खंडाळा शहरात पाणीपुरवठा विहिरीला कमी पडलेले पाणी तसेच शहरात पुरवठा पाईपलाईनला बिघाड झाल्याने शहराच्या काही भागात पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना नगरपंचायत प्रशासनाला आता पाणीटंचाईच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे.
खंडाळा तालुक्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभराच्या पाण्यासाठी चणचण भासत आहे. शहरातील लोकांना गरजेपुरते पाणी मिळावे, यासाठी आटापिटा करावा लागत आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
२१खंडाळा
खंडाळा शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाणी कमी झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.