सातारा : येणारा उन्हाळा सुसह्य जावा यासाठी सातारकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली असून, तलावात दोन महिने पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. टंचाई दूर करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यंदाही पाणीकपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरठा केला जातो. कास ही सातारा शहराची सर्वांत जुनी पाणी योजना आहे. पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावात २५ फूट इतका पाणीसाठा होतो. या तलावातून शहराला प्रतिदिन साडेपाच लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची दैनंदिन गरज पाहता तलावाची पातळी दररोज एका इंचाने खालावत असते. उन्हाळ्यात बाष्पीभवानाचादेखील जलसाठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिना उजाडला की पालिकेकडून पाणीकपात सुरू केली जाते. प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यात एक दिवस बंद ठेवला जातो व पाण्याची बचत करून ते पाणी पाऊस सुरू होईपर्यंत वापरले जाते.
कास तलावात यंदा १४ फूट पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीपेक्षा एक फुटाने कमी आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. तोवर पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान असणार आहे. पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीबाबत चाचपणी केली असली तरी याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात होऊ शकते. पाण्याची दैनंदिन गरज व उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
.. तर ही शेवटची टंचाई
सातारा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाची उंची वाढीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले असून, मे अखेर उर्वरित काम मार्गी लावले जाणार आहे. जरी काम पूर्णत्वास आले नाही तरी पावसाळ्यात काही प्रमाणात धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. जलसंचय केल्यास सातारकरांसाठी ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.
(कोट)
कास तलावात सध्या पाणीसाठा टिकून आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी पाणीकपात करावी की न करावी याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कास योजनेला शहापूरचे क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले आहे. त्यामुळे कासचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.
- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती
(चौकट)
पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा
एकूण नळधारक : १६०००
कासमधून पुरवठा : प्रतिदिन ५.५० लाख लिटर
शहापूरमधून पुरवठा : प्रतिदिन ८ लाख लिटर
प्रतिमाणसी पाणी : ११० लिटर
जीवन प्राधिकरणचा पुरवठा : प्रतिदिन २७ लाख लिटर
जलशुद्धिकरण केंद्र : २
फोटो : ११ कास डॅम फोटो