सातारा - सातारा नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने सातारचे दोन्ही राजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या कलगीतुऱ्यानं नगरपालिकेचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. सातारा नगरपालिकेवर सत्ता असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत भ्रष्टाचार करणारी आघाडी सातारकर सत्तेतून खाली आणतील आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा अजिंक्यतारांवर कडेलोट करेल अशी घणाघाती टीका सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली आहे.
बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले हे भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा सातारकर दिशा दाखवतील अशी टीका आमदार शिवेंद्रराजेंवर केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील सडेतोड टीका केली आहे. उदयनराजे कोणाचा कडेलोट करतील की नाही हे माहित नाही पण येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातारकर उदयनराजेंच्या आघाडीला धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत. नगरपालिकेतून शंभर टक्के उदयनराजेंचा कडेलोट होणार ही वस्तुस्थिती आहे असं शिवेंद्रराजे म्हणाले.
काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?सातारा नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. यावेळी खासदार उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी करत निशाणा साधला होता. माझ्यावर पैसे खाल्ल्यांचा आरोप केला जात असताना मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? ५ रुपयांचा प्रश्न असता तरी त्यांनी ५ रुपये फोकस करून दाखवलं असतं. मी गैर करत नाही आणि गैर खपवून घेत नाही. कोणीपण असुदे, तुम्ही ठिकाण निवडा जर मी पैसे खाल्ले हे सिद्ध झाले तर अजिंक्यताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांनी उडी मारावी असे आवाहन खासदार उदयनराजेंनी टीकाकारांना दिले होते.
सातारा नगर पालिकेची हद्दवाढ लक्षात घेता आणि पालिकेच्या सध्या असलेली इमारतीची दयनीय अवस्था झाली असल्याने नवीन इमारत ९ मजली करण्यात येणार आहे. पालिकेला ही जागा बाबा कल्याणी यांनी विनामूल्य दिली आहे. माझ्या विरोधात भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात त्यांनी थोडीतरी जनाची नाही मनाची लाज बाळगली पाहिजे. सध्याचे विचारवंत लोकप्रतिनिधी आम्हालाच नावे ठेवतात असे सांगत खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना टोला लगावला होता. तुमच्या जाहिरनाम्यात कास धरणाच्या उंचीत ज्यांचा साधा उल्लेख नव्हता त्या दादांनी पैसे दिले असे आपण सांगता ते दादा कोण? असा सवाल आमदार शिवेंद्रराजेंना उपस्थित केला होता.