टीका करणाऱ्या भाजपचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:54+5:302021-04-15T12:06:48+5:30
Prithviraj Chavan Bjp Congress Satata : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
मलकापूर : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
मलकापूर पालिका आणि कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, धनाजी काटकर, निवास थोरात, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार, जयंत कुराडे, नगरसेविका गीतांजली पाटील, स्वाती तुपे, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण, नंदा भोसले, विद्या थोरवडे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘प्रत्येक देशाने कर्ज काढले, नोटा छापल्या आणि कोरोनापासून बचावासाठी अब्जावधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र, देशातील मोदी सरकारने गेल्या लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केली होती. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांना थेट मदत व्हावी अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी होती. मात्र, राज्य सरकारने ती मागणी मान्य करत थेट मदतीचे पॅकेज दिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक उत्सवाला सूट दिल्याने तिथे कोरोनाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा उत्सवांना परवानगी देणे निषेधार्ह आहे. त्याला उत्तर प्रदेश व केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांचा ९६ हजारचा उच्चांक होता. आता तो एक लाख ८४ हजार म्हणजे दुपटीने वाढला आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाच्या वागणुकीची अपेक्षा नव्हती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
रक्तदान शिबिरास प्रतिसाद...
रक्तदान शिबिरात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाहनचालकाने रक्तदान करत युवकांसमोर आदर्श ठेवला. तसेच रक्तदान करण्यासाठी शहरातील महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. पालिका पदाधिकाऱ्यांसह शहर व कऱ्हाड दक्षिणमधील युवकांनीही रक्तदान केले. यशवंत ब्लड बँकेचे डॉ. संदीप यादव यांच्यासह त्यांचा सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी केले.