कऱ्हाड : नदीपात्रात पोहायला गेलेल्या नागरिकावर मगरीने हल्ला केला. पात्रात पोहत असताना अचानक मगरीने संबंधिताचा पाय जबड्यात पकडल्यामुळे पायाला मोठी जखम झाली. मात्र, प्रसंगावधान राखत संबंधिताने पात्र बाहेर धाव घेतल्यामुळे त्याचा जीव बचावला. शहरातील प्रीतीसंगमावर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मधुकर लक्ष्मण थोरात (रा. कराड) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. कराड येथील कृष्णा नदीत रोज सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक पोहायला येत असतात. रोज पोहणारे तीन मोठे ग्रुप आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस जणांचा एक ग्रुप या ठिकाणी पोहायला गेलेला होता. पोहणारे तीन-चार लोक नदीच्या आत मध्यभागी गेले असता, यामधील मधुकर थोरात यांच्या पायाला कोणीतरी ओढत असल्याची त्यांना जाणीव झाली. यावेळी त्यांनी पाहिले असता मगरीने त्यांच्या पायाला तोंडात पकडले असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे ते घाबरले. त्यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली.
त्यामुळे त्यांचे इतर दोन मित्र जवळ आले. त्यांनी मधुकर थोरात यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर कृष्णा नदीमध्ये पोहायला येणाऱ्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोहायला येणारे अनेक लोक या घटनेमुळे नदीकाठी थांबले होते. गत काही दिवसांपासून कराड शहरासह टेंभू, खोडशी भागात मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नदीपात्रात जाणे धोक्याचे बनले आहे.