सणबूर : वांग नदीपात्रात मगरीचे दर्शन घडले असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वांग नदीत मासेमारी, नदीकाठी धुण्यासाठी महिला जातात तर नदीकाठी शेतीपंपाच्या मोटरी असल्याने, शेतकऱ्यांची येजा होत असते, अशावेळी मगर कुणाच्या जीवावर उठू नये यासाठी तिचा वन्यजीव विभागाकडून बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
साईकडे येथील कृष्णात उबाळे हे दोन दिवसांपूर्वी सकाळी साडेअकराच्या सुमारास जरूरी कामानिमित्त ढेबेवाडी येथे आले होते. घरी जाताना ते ढेबेवाडी येथील संगम पुलावर आले असता त्यांना पाण्यात मोठी हालचाल दिसली. त्यामुळे ते थांबले असता त्यांना पाण्यात मगर दिसून आली. यावेळी खालच्या जुन्या पुलाजवळ चार-पाचजण होते. त्यांनी मगर पाहून धूम ठोकली. आजूबाजूला मासे पकडणारे तसेच शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना उबाळे यांनी सावध केले.
वांग नदीपत्रात मगर असणे धोकादायक असून अनेक शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटरी नदीशेजारी आहेत. त्यांना शेतीपंपाची लाईट असेल त्यावेळी रात्री-अपरात्री मोटार सुरू करण्यासाठी जावे लागत असते. त्यांच्या जीवावर कोणता प्रसंग बेतू नये, याशिवाय नदीकाठी अनेक गावांतील महिला कपडे धुणेसाठी जात असतात यांच्यासाठी ही फार धोकादायक बाब आहे. मासे पकडणारे अनेकजण उपजीविकेचे साधन म्हणून मासे पकडण्यासाठी नदी पत्रात जात असतात. यांच्यावर कधीही जीवघेणा प्रसंग येऊ शकतो.
चौकट
मी स्वतः मगर पाहिली असून अचंबित झालो. मगर फार मोठी आहे लोकांना याची माहिती दिली पाहिजे. मी अनेकांना याविषयी कल्पना दिली आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांना याची माहिती दिली आहे. ढेबेवाडी विभागात पहिल्यांदाच वांग नदीमध्ये मगर दिसून अली आहे.
- कृष्णत उबाळे,
निवृत्त पोलीस अधिकारी साईकडे
वांगनदी संगमाजवळ शेतीच्या कामासाठी, कपडे धुण्यासाठी महिला जात असतात. त्यांना मगर असल्याची माहिती दिली आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांनाही माहिती दिली असून मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
- आत्माराम पाचूपते,
सरपंच,पाचूपतेवाडी