पिकांचे नुकसान
महाबळेश्वर : महाबळेश्वरसह परिसरातील शेतकरी सध्या वन्य प्राण्यांकडून सुरू असलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे घायकुतीला आले आहेत. गवा तसेच रानडुकरांकडून स्ट्रॉबेरी, फरसबी तसेच इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यंदा लॉकडाऊन व परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता वन्यप्राण्यांकडून पिके उद्धवस्त केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.
भटक्या जनावरांचा
वाहतुकीला अडथळा
सातारा : शहरातील पोवई नाका ते बसस्थानक मार्ग, राजपथ, भाजी मंडई, राधिका रस्ता या परिसरात मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही जनावरे रस्त्यातच बसत असल्याने याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या मोकाट जनावरे पकडून ती सोनगाव डेपोत सोडण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेने तत्काळ कार्यवाही करून जनावरांना कोंडवाड्यात ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
केळघर घाटातील
कठड्यांची दुरवस्था
मेढा : मेढा - महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धोकादायक वळणांवरील कठडे तुटले असून, काही ठिकाणचे कठडे तर नावापुरतेच उरले आहेत. घाटातील धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याचे वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसते. घाटातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बांधकाम विभागाने संरक्षक कठड्यांची उभारणी करावी, धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.