खटाव : ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याला आता आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हातातोंडाशी आलेली पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. एकीकडे आगाप कांद्याची काढण्याची घाई, तर दुसरीकडे गहू, हरभरा, ज्वारी, आदी पिके काढण्याची वेळ आली असतानाच पावसाची हजेरी लावल्याने हातात आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या आगाप कांद्याच्या काढणीची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे उन्हाळी हंगामाचा कांदा पीक सर्वत्र जोमात असतानाच पाऊस व त्याचबरोबर पडलेल्या गारामुळे अत्यंत नाजूक असलेल्या या पिकावर असता मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवत आहे. कांद्याबरोबरच मागास असलेल्या गहू, हरभरा पिकांवर या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. आगाप कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी त्याच्या काढणीच्या व काटणी करून मार्केटमध्ये पाठविण्याच्या गडबडीत आहेत. या बदललेल्या वातावरणाची त्याला देखील धास्ती बसली आहे. आता कुठे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्यामुळे त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेतात पळापळ करताना दिसत आहे. कांदा लागवडीनंतर मागीलवर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्याला त्याच्या मालाला दर चढा मिळत आहे, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. घाऊक बाजारात प्रति किलो कांदा ४० ते ५० रुपये दराने विकला जात आहे. नवीन उत्पादन बाजारात येईपर्यंत अस्मानी संकटाने जर असेच आक्रमण ठेवले तर मात्र कांदा उत्पादनात घट होणार आहे.
कोट..
स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला कांद्याच्या वाढत्या दरामुळे गृहिणी व सर्वसामान्य लोकांचे बजेट मात्र चांगलेच कोलमडले आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी व निसर्गाच्या या बदलत्या रुपामुळे उत्पादनात घट येत आहे. आवक कमी झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने जोपर्यंत कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील.
- तानाजी यादव, कांदा व्यापारी
२१खटाव
कॅप्शन : कांद्याला असलेला वाढता दर, तसेच अवकाळीच्या भीतीने आगाप काढून ठेवलेल्या कडा भरणीच्या लगबगीत शेतकरी.