मलकापूरः
मलकापूरसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने थैमान घातले. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले.
ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर मोडून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दोन दिवसांपासून उकाड्याची तीव्रता वाढली होती. दुपारनंतर आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोराचा वारा व मुसळधार पावसास सुरुवात झाली. अचानक आलेल्या वाऱ्यासह पावसामुळे मळकापूर, कापील, जखीणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले. तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.