सातारा : राजपथावर घडलेली दुर्घटना हा डॉल्बीच्या आवाजाने झाला नसून भिंत जीर्ण असल्यामुळे झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, डॉल्बीमुळेच ही घटना घडल्याचे छातीठोकपणे सांगणारेही असून, सामाजिक संस्था आणि काही मंडळांनीही डॉल्बीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.ही घटना घडली त्यावेळी येथील व्यावसायिक संतोष पोळ आपल्या काही मित्रांसह विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते. एका मंडळाचा गणपती देवी चौकात होता तर दुसऱ्या मंडळाचा गणपती खण आळीच्या तोंडावर होता असे पोळ यांचे म्हणणे आहे. या दोन्ही मंडळांच्या पुढे डॉल्बी वाजत होता. पण ते अंतर बरेच असल्याने इतक्या लांबच्या अंतराचा आणि डॉल्बीच्या आवाजाने भिंत पडल्याचा काही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.या इमारतीचा धोकादायक इमारतींमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही इमारत पाडण्याचे प्राथमिक काम सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. वास्तविक, कोणतेही बांधकाम पाडायचे असेल तर त्या इमारतीभोवती पत्रा लावून ते सुरक्षित केले जाते. ही इमारत पाडण्यापूर्वी संबंधित घरमालकांनी ही काळजी घेतली नव्हती. बोले यांची वडापावची गाडी नेहमी भिंतीला चिटकून रस्त्याच्या बाजूलाच असायची. विसर्जन मिरवुणकीत नागरिकांना अडथळा नको म्हणून त्यांनी त्यांची गाडी आतील बोळात लावल्याचेही काही व्यावसायिकांनी सांगितले. एकंदरीत या दुर्घटनेस डॉल्बी आणि अन्य बाबी किती जबाबदार याविषयी चर्चा सुरू असली, तरी ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला...’ या उक्तीनुसार दुर्घटनेचे एक कारण म्हणून डॉल्बी चर्चेत आली आहे. (प्रतिनिधी)
कावळा बसायला अन् फांदी तुटायला...
By admin | Published: September 09, 2014 10:39 PM