खटाव : कोरोनाचा वाढता आलेख पाहता नागरिकांमध्ये कमालीची दहशत दिसून येत आहे. याला प्रतिकार करण्यासाठी थ्री सूत्रे जरी पाळावयाची असली तरी कोरोना कमी होत नाही. त्यामुळे खटावमध्ये लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, लसीकरणासाठी गर्दी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे, हे आता ग्रामीण भागातील लोकांना जाणवू लागल्यामुळे आता लसीकरण केंद्राबाहेर रांग व गर्दी होताना दिसून येते. लस घेतल्यानंतर त्रास होतो, असा सुरुवातीस गैरसमज पसरला होता. विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांनी लस न घेण्याचे कारण संसर्ग होण्याची भीती वाटते, असे सांगितले गेले.
देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, ही पहिल्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. पहिल्या लाटेच्या वेळी लस उपलब्ध नव्हती, परंतु आता उपलब्ध आहे, ही जमेची बाजू असतानाही नागरिक सुरुवातीला त्याकडे कानाडोळा करत होते. परंतु, आता मात्र लसीशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे ही लस अत्यंत सुरक्षित असून, त्याच्यामुळे आपले जीवन सुरक्षित होणार आहे याची खात्री झाल्यामुळे आता नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर गर्दी होताना दिसून येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून लसीकरण बंद होते. त्यामुळे सोमवारी खटावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
कोरोना नियमांचे पालन करत नागरिकांचे आधार कार्ड पाहून रजिस्ट्रेशन करून लस देण्यात येत होती.
लसीचा पुरवठा दोन-तीन दिवसांतून होत असल्यामुळे लस उपलब्ध होईल तसे पात्र लाभार्थ्यांना ती देण्याचे काम सुरू आहे. खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवारी ३२० लसींचा पुरवठा झाला होता. त्यामधून या केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपकेंद्रामध्येही मागणीनुसार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. शिल्लक १२० मधून लस देण्यात आली असल्याचे येथील डॉ. रणदिवे यांनी सांगितले.
फोटो नम्रता भोसले यांनी पाठविला आहे.
खटावमध्ये सोमवारी कोरोना लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. (छाया : नम्रता भोसले)