सांगली : शेळीपालनातून रक्कम दहापट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी जागृती अॅग्रो फूडस् इंडियाचा प्रमुख राज गणपतराव गायकवाड याला कर्नाटकात अटक झाल्याने सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. बुधवारी गुंतवणूकदारांनी जागृती फर्मसमोर गर्दी करून पैसे परत देण्याची मागणी केली. याबाबत पोलिसांत एकही तक्रार दाखल झालेली नाही. शेळीपालनातून पैसे दहापट करून देण्याचे आमिष दाखवून जागृती अॅग्रोने महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात जाळे विणले आहे. तडसर (ता. कडेगाव) व बेळंकी (ता. मिरज) या ठिकाणी जागृतीने प्रकल्प उभारले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी यात गुंतवणूक केली आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील संतपूर पोलीस ठाण्यात राज गायकवाडविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याला सोमवारी रात्री कर्नाटक पोलिसांनी सांगलीतून जेरबंद केले. त्याचे वृत्त बुधवारी जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे खळबळ उडाली. गुंतवणूकदारांनी येथील मार्केट यार्डातील ‘जागृती’च्या कार्यालयात चौकशीसाठी गर्दी केली होती. अनेकांनी गुंतविलेले पैसे तातडीने परत देण्याची मागणी केली. गुंतवणूकदारांचा ओघ सुरू होता. सांगली पोलिसांनीही जागृती अॅग्रोची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे, पण एकही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. (प्रतिनिधी)
सांगलीत जागृती फर्ममध्ये गुंतवणूकदारांची गर्दी
By admin | Published: September 17, 2015 12:46 AM