सातारा : एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे सातारकर अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी असतानाही सलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याच्या बाजारपेठेत नागरिकांसह वाहनधारकांची गर्दी दिसून आली. खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सकाळी गर्दी तर दुपारी शुकशुकाट असे चित्र शहरात दिसून आले.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. सातारा जिल्ह्यासह शहरात या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, नागरिकांकडून शासन नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी लोटली. दुसऱ्या दिवशी काहीशी अशीच परिस्थिती होती. पोलिसांनी कारवाई करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना समज दिली; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी देखील बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडई गर्दीने गजबजून गेल्या होत्या. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करण्यात आले. किराणा दुकानाच्या बाहेरही नागरिकांची गर्दी जाणवली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने बहुतांश नागरिकांनी दुपारी बारा वाजेपर्यंत भरभरून खरेदी केली. दुपारनंतर मात्र शहरातील प्रमुख रस्ते, चौक ओस पडले होते. घराबाहेर विनाकारण पडणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते तसेच गल्लीबोळातही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे वाहनधारकांनी चांगलीच धास्ती घेतली.
(चौकट)
एवढा निष्काळजीपणा कशासाठी..?
जिल्ह्यात दररोज हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. रुग्णांसाठी रुग्णालयात बेडही उपलब्ध होईनात, हे वास्तव असताना नागरिक संचारबंदी नियमाचे उल्लंघन करून बाजारपेठेत निर्धास्त वावरत आहेत. वाहनधारक विनाकारण फेरफटका मारत आहेत. हा निष्काळजीपणा स्वतःसह इतरांच्या सुरक्षेला कारणीभूत ठरू शकतो. सातारकरांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, शासन नियमांचे पालन करावे तरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे.
(पॉइंटर)
गेल्या सहा दिवसांतील कोरोनाबाधित
वार बाधित मृत्यू
सोमवार १०१६ १०
मंगळवार ११९० ११
बुधवार ११०० १४
गुरुवार ११८४ २२
शुक्रवार १३९५ १५
शनिवार १५४३ ३८
एकूण ७४२८ ११०
फोटो : जावेद खान