सातारा : राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात तक्रार देण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून जनतेने गर्दी केली होती. ८१ तक्रारींचा आमदार शशिकांत शिंदे यांनी निपटारा केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनात केवळ एक ते दोन तक्रारींची नोंद होत असते. मात्र, राष्ट्रवादी भवनातील जनता दरबारात अनेक जणांनी गर्दी केली होती. शेतीवाडीला रस्ता मिळत नाही, वीज मिळत नाही, शासकीय कार्यालयांत खेटे मारावे लागतात, मारहाण झाली असतानाही पोलीस तक्रारी घेत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी यावेळी दाखल झाल्या.
आमदार शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षांच्या दालनात बसून या तक्रारींचा जागेवरच निपटारा केला. या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना फोन केले. तसेच लोकांची रखडलेली कामे लवकर करण्याबाबत सूचना केल्या. पुढील काळात तक्रार येऊ देऊ नका, असेही त्यांनी सुनावले.
तक्रारी घेऊन आलेले लोक राष्ट्रवादी भवनातील हॉलमध्ये तसेच पोर्चमध्ये गर्दी करुन उभे होते. अनेकांनी बाहेर सावलीचा देखील आधार घेतला. यावेळी ८१ तक्रारी दाखल झाल्या.
फोटो ओळ : सातारा येथील राष्ट्रवादी भवनात सोमवारी आमदार शशिकांत शिंदे यांनी जनता दरबार घेऊन तक्रारींचा निपटारा केला.
फोटो नेम : 15राष्ट्रवादी