सातारा : शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी लसीकरण मोहिमेला खो बसला. लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केलेले लोक केंद्रावरील बोर्ड पाहून नाराज होऊन घरी परत गेले.
सातारा शहरामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय तसेच गोडोली येथील नगरपालिका रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू होती. जेवढ्या लसी उपलब्ध झाल्या आहेत, तेवढ्याच लोकांना कुपन देऊन लसीकरण केले जात होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे वय वर्षे ४५ च्या वरील नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी केली होती. तास - दीड तास लोक लसीकरण केंद्रावर थांबून होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने लस संपल्याचा फलक जागोजागी लावण्यात आला.
४५ वयाच्या वरील लोकांना ऑनलाईन नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे. त्यामुळे आपला नंबर लवकर लागावा या हेतूने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करतात. मात्र, लसी मिळत नसल्याने या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
सातारा, कोरेगाव, फलटण, वाई, म्हसवड, कऱ्हाड या शहरांमध्ये सकाळपासूनच लसीकरणासाठी गर्दी झाली होती. लस संपल्याचा बोर्ड प्रशासनाच्या वतीने लावण्यात आला होता. तरी देखील लोक केंद्रावर थांबून राहिले. लसीकरण केंद्रावर कुठेही पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत नाही. तसेच केंद्रावर येत असलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था देखील नाही. केंद्रावर प्रशासनाने मंडप उभा केला आहे. मात्र, या केंद्रावर जागोजागी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. राजकीय मंडळी वशिलेबाजी लावून कार्यकर्त्यांचे लसीकरण करून घेत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. लसीकरणासाठी गर्दी होते, ती नियंत्रित करायला पोलीस नव्हते. लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे देखील पुढे येत आहे.
फोटो ओळ : कोरेगाव येथील लसीकरण केंद्रावर लस संपली असताना देखील अशा पद्धतीने मंगळवारी नागरिकांची गर्दी झाली होती. (छाया : साहिल शहा)