करंजे : सातारा शहरातील गोडोली आरोग्य केंद्रात लस नसतानाही नागरिकांची गर्दी झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
आरोग्य यंत्रणेमार्फत व गोडोली येथील नगरसेवक शेखर मोरे यांनी नागरिकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. परंतु नागरिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. नागरिकांनी एकच गोंधळ घातला. आम्ही रांगेत उभे राहिल्यावरच कशी लस उपलब्ध होत नाही, असे म्हणत बराच वेळ अधिकाऱ्यांसोबत गोंधळ घातला. यातून बरेच वादविवाद होताना पाहावयास मिळाले. आरोग्य अधिकारी व नगरसेवक यांच्या संगनमताने ज्यावेळी लस उपलब्ध होईल, त्या वेळी टोकनपद्धत बंद करत जो कोणी रांगेत प्रथम उभा असेल व जेवढ्या लसी उपलब्ध असतील, तेवढ्याच लोकांना लस दिली जाईल व लसींची जेवढी आवक झाली आहे, तेवढ्यात लोक रांगेत उभे केले जातील, असा निर्णय घेण्यात आला. असेच प्रकार सातारा शहरातील अनेक लसी केंद्रांत पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आदल्या दिवशी लस उपलब्ध आहे की नाही याचे सूचनाफलक केंद्राच्या बाहेर लावले जातील, असे सांगितले आहे. नागरिकांनी फलकावरील सूचना वाचून लस उपलब्ध आहे की नाही याची खात्री करूनच रांगेत उभे राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.
फोटो आहे.