नागरिकांची गर्दी
सातारा : संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने सातारा शहर व परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. अजिंक्यतारा किल्ला, मंगळाई देवी मंदिर, चार भिंती, कुरणेश्वर, यवतेश्वर, शाहू स्टेडियम, अंबेदरे मार्ग या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पावसाने उघडीप दिल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले आहेत.
भटक्या जनावरांचा
वाहतुकीला अडथळा
सातारा : शहर व परिसरात भटक्या जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने रहदारीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. प्रामुख्याने येथील भाजी मंडई, राधिका रस्ता, गोल मारुती व समर्थ मंदिर परिसरात मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. पालिकेने जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवावे, अशी मागणी होत आहे.
महाबळेश्वरात
थंडीमध्ये वाढ
महाबळेश्वर : महाबळेश्वरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शहरी, तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रविवारी हवामान विभागाने महाबळेश्वरचे कमाल तापमान ३०.१, तर किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. सायंकाळनंतर हवेत गारव्याचे प्रमाण वाढत आहे.