अंगापूर : कोरोनानंतर मार्च महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने वर्दळ वाढली आहे. अंगापूर परिसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी महिन्यापासून सुरू होती. गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व ठेवण्यासाठी गटातटाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याने अंगापूर परिसरात ग्रामपंचायतीच्या शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी चुरस वाढणार, हे मात्र नक्की आहे.
सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व जागृत असणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अंगापूर वंदन, वर्णे, निगडी तर्फ सातारा, फडतरवाडीमधील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काही महिन्यांपासून स्थानिक नेत्यांची बांधणी सुरू होती. निवडणुका जाहीर होताच या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहावे यासाठी प्रचाराची गावागावांत रणधुमाळी दिसून येत होती.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोपण यामुळे संपूर्ण गावे ढवळून निघाले होते. या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गावांच्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावच्या शाळा दहा महिन्यांपासून बंद आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या शाळांमध्ये गुरुवारपासून वर्दळ वाढली आहे. शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
चौकट....
अंगापूर वंदन ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अंगापूर येथील जि्ल्हा परिषद शाळा क्रमांक १ सज्ज झाली आहे. चार वार्डांतील मतदानासाठी शाळेच्या सहा खोल्यांत प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी एकूण ५४ प्रशासकीय कर्मचारी दक्ष असणार आहेत.
फोटो १४अंगापूर
अंगापूर येथे दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच वर्दळ वाढली आहे. (छाया : संदीप कणसे)