कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात १ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचे नियम पायदळी तुडविताना दिसत आहेत. नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. हे पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील ज्येष्ठ शेतकरी बँकांकडे लांबच लांब रांगा लावत आहेत.
यावेळी या रांगेमध्ये कुठेही सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत.
यावेळी अनावश्यक गर्दी टाळून गरज असेल तरच पैसे काढावे, असे आवाहन वडूथ येथील बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अनिल साळवे यांनी खातेदार शेतकऱ्यांना केली आहे.