पाचगणी : जिल्ह्यात मंगळवारपासून लागू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या धास्तीने नियमित आजारांची औषधे घेण्याकरिता अत्यावश्यक सेवेच्या औषधांच्या दुकानांत गर्दी होत आहे. प्रशासनाच्या प्रश्नाच्या सरबत्तीला बगल देत आजच औषध खरेदी करताना नागरिक पाहायला मिळत आहेत.
सातारा जिल्ह्यात बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळपासून कडक लॉकडाऊन सुरू असल्याने आदल्या दिवशी सोमवारी पाचगणीमध्ये किराणा, भाजीपालासाठी गर्दी तर झालीच; पण नियमित सुरू असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील औषधांच्या दुकानांतही नेहमीपेक्षा खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
कडक लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडल्यास प्रशासन प्रश्नांची सरबत्ती करेल तर त्या प्रश्नांची सोडवणूक म्हणून आपल्या घरांतील वयोवृद्ध व्यक्तींच्या काळजीपोटी नागरिकांनी औषधांचा साठा घरात असावा म्हणून गरजेची औषधे घेणे आवश्यक समजले.
कोट..
रोज मेडिकल चालू असूनही कडक लॉकडाऊनच्या धास्तीने औषधे मिळतील की नाही या धास्तीने आजच दुकानात ग्राहकांनी औषध खरेदी केली. पण मेडिकल तर अत्यावश्यक सेवेत असल्याने ते चालूच राहणार आहेत.
-राहुल लोकरे, श्रीकृष्ण मेडिकल, पाचगणी
कोट..
कडक लॉकडाऊन सुरू होणार असल्याने मेडिकल दुकाने चालू आहेतच; परंतु घराबाहेर पडून औषध खरेदी करण्याकरिता बाहेर प्रशासनाच्या प्रश्नांना प्रथम उत्तरे देता नाकी नऊ येईल म्हणून घरातील वयोवृद्ध व्यक्तीचा औषधांचा साठा घरी असणे आवश्यक म्हणून उद्याची औषध खरेदी आजच केली.
-आशीष दवे, पाचगणी