लोकमत न्यूज नेटवर्क
चाफळ : चाफळ विभागातील सडावाघापूरजवळील उलटा धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या या परिसरात पडत असलेला रिमझिम पाऊस व दाट धुके निसर्गसौंदर्यात भर टाकत आहे. मात्र, हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्याही तितकीच वाढलेली आहे. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करत पर्यटक सैराट होऊ लागले आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी पोलीस वेळोवेळी अटकाव करत आहेत. मात्र, गर्दी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. पर्यटकांना आवर घालण्याची मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.
चाफळच्या पश्चिमेला उंच डोंगर पठारावर सडावाघापूर हे गाव पाटण - तारळे रस्त्यालगत आहे. या गावापासून काही अंतरावर सध्या पर्यटकांना खुणावणारा उलटा धबधबा हे ठिकाण आहे. उंब्रज चाफळ - दाढोलीमार्गेही या ठिकाणाकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. कास, ठोसेघर, कोयनापाठोपाठ हा उलटा धबधबा सध्या निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण ठरू लागला आहे. येथील निसर्गरम्य परिसर, उंच पनवचक्क्या व दाट धुक्याची दुलई, हिरवाईने फुललेला हा परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. दिवसेंदिवस येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. हे सौंदर्य व धबधबा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी या परिसराला भेट देत आहेत. वाहतुकीची चांगली सोय असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
सद्यस्थितीत या उलटा धबधबा स्थळाला हुल्लडबाज तरुणांचे ग्रहण लागले आहे. दारूच्या नशेत कपडे काढून वाहनातील गाण्यांवर ही तरुणाई सैराट होताना दिसून येत आहे. बऱ्याचवेळा मद्यधुंद अवस्थेत जीव धोक्यात घालून कड्याजवळ ही मंडळी दारूच्या रिकाम्या बाटल्या डोक्यावर घेऊन नाचताना आढळून येत आहेत. संबंधितांना ना कुणाची भीती ना कुणाचा अटकाव, त्यामुळे तर येथे हुल्लडबाजी पर्यटकांच्या अंगलट येत आहे. याठिकाणी येणाऱ्या मद्यपींचा महिला पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीवरून ट्रीपलसीट, घाटातून जोरजोरात ओरडत बेभान होऊन गाड्या चालवत इतर गाड्यांना आडव्या मारणे तसेच या परिसरातील महिलांना अश्लील बोलणे, धक्काबुक्की करणे अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यातूनच काहीजण नशेत घाटात दुचाकीवरून पडून थेट दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत.
(कोट)
सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करू पाहणाऱ्या मद्यपी सैराट पर्यटकांना अटकाव घालणे गरजेचे बनले आहे. आमच्या गावातील महिला, ग्रामस्थांना अनेकदा शिवीगाळ करत धक्काबुक्की केली जात आहे. हा प्रकार निंदनीय आहे. चाफळसह पाटण व तारळे पोलिसांनी मोहीम सुरूच ठेवत या हुल्लडबाज पर्यटकांना चाप लावणे गरजेचे आहे.
- बापूराव दंडिले, सरपंच, सडावाघापूर
फोटो आहे..
२३ सडावाघापूर