कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गत चार दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत, तसेच त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. त्यामुळे रविवारपासूनच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. तसेच प्रक्षोभक वक्तव्येही केली होती; मात्र तरीही भाजप नेते किरीट सोमय्या रविवारी रात्री मुंबईहून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री नोटीस काढून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात प्रवेशास मनाई केली. त्याबाबतचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा व कोल्हापूर पोलिसांनी कऱ्हाडनजीक ओगलेवाडी रेल्वे स्थानकात किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतले. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखविण्यात आला, तसेच कोल्हापूरला जाता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना कऱ्हाडातील विश्रामगृहात स्थानबद्ध करण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत ते त्याठिकाणी होते. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारने पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
- चौकट (फोटो : २०केआरडी०२)
पोलीस बंदोबस्त तैनात
कऱ्हाडात किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध केल्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ओगलेवाडी रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तर कऱ्हाडातील शासकीय विश्रामगृहालाही पोलिसांनी वेढा दिला होता. विश्रामगृहाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते, तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड येथील ओगलेवाडी रेल्वे स्थानकातून सोमवारी पहाटे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.