महाबळेश्वर : आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्यात आली आहेत. शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाबळेश्वर परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीने विक्रमच केला. वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील नीचांकी तापमान ० ते उणे २ पर्यंत गेले होते. रविवारी सकाळी मळेधारक स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
थंडीचा कडका व हिमकणांमुळे स्ट्रॉबेरी, फळभाज्या, पालेभाज्या व फूल शेती करणाºया शेतकºयांची रोपे गारठून मरू लागली आहे. त्यामुळे बाजार आणलेल्या स्ट्रॉबेरी फळे ही नासलेली आढळून आली. तसेच त्यांचा आकार व बेचव लागत आहेत. अशीच परिस्थिती फळ, पाले भाज्या व शोभिवंत फूल शेतीची झाली आहे. त्याच्या मळ्यातील तूतू (मलबेरी), जांभूळ,पेरूची झाडे थंडीमुळे पूर्णपणे काळी पडली आहेत. वांगी, वाटणा, फारशी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदीची रोपेही जाळून गेली आहेत. झेंडू, गुलाब, जरबेरी, कर्दळ, सदाफुली, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.
कडाक्याच्या थंडीने जळून व कुजून गेल्याने अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली आहे. हीच परिस्थिती वाटाणा, कोबी, फ्लॉवर फळ, पालेभाज्या व फूल शेती करणाºया शेतकºयांची असून, त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे मळेधारक हवालदिल झाला असून, हातातोंडाला आलेल्या फळांचे अचानक नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू शोककळाच पसरली आहे.
हंगाम गेला वाया..
महाबळेश्वर म्हटंले की स्ट्रॉबेरीची मधुर फळे डोळ््यासमोर येतात. परिसरातून दररोज हजारो टन स्ट्रॉबेरी देशभरात पाठविली जातात. मात्र, थंडीच्या कडाक्याने रोपेच जळाल्याने यंदाचा हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा एक ते दीड महिने थांबावे लागणार आहे. शिवाय एप्रिल-मे महिन्यांत काही भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
एवढी मेहनत करून, रात्रंदिवस पहारा करून गव्यापासून त्याचे रक्षण केले. मात्र आजच्या अचानकच्या संकटामुळे तयार फळे फेकण्याची वेळ आली आहे. शासनाने खास बाब म्हणून तातडीची मदत करावी.
- आसिफभाई मुलाणी, मळेधारक शेतकरी