सातारा : गावाच्या गरजा ओळखून जलसंधारण, कृषी, ग्रामविकास कामांची निवड करावी यासाठी योग्य प्रस्ताव सादर केल्यानंतर खात्री करूनच संबंधित कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाते. राज्यात नाम फाउंडेशनकडून गावांना विकासात्मक प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते. सातारा जिल्ह्यातही लोकसहभागातून विकासकामे करणाऱ्या गावांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध होईल, असे आश्वासन नाम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांनी दिले.वर्ये (ता. सातारा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील महिला सरपंचांना सीएसआर फंडाची मदत होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी थोरात बोलत होते. दीपस्तंभ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय जोशी, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, नाम फाऊंडेशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.अमेय जोशी म्हणाले, कंपन्यांकडून सीएसआर फंड देताना गावाची गरज, त्याची उपयुक्तता, लोकसहभाग, अंमलबजावणी, शाश्वतता विचारात घेतली जाते. तसेच जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, सौरऊर्जा वापर, महिला सक्षमीकरण, यासाठीच्या कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून देण्यात येते. योग्य प्रस्ताव आल्यानंतर गुणवत्तापूर्वक कामे करून घेण्याची जबाबदारी घेणाऱ्या गावांना नक्कीच मदत करू. यासाठी गावाने पुढाकार घेतला तर आम्हीही सोबत राहू.जितेंद्र भोसले म्हणाले, जिल्ह्यातील सरपंचांनी पुढाकार घेऊन सीएसआर फंडातून करावयाच्या कामांचे प्रस्ताव सरपंच परिषदेकडे सादर करावेत. विकासकामांसाठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यावेळी जिल्ह्यातील महिला सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्राचार्य विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. बी. एस. सावंत यांनी आभार मानले.
लोकसहभागातील विकासाला सीएसआर फंडाची मदत, नाम फाऊंडेशनच्या सीईओंनी दिले आश्वासन
By नितीन काळेल | Published: May 17, 2024 7:22 PM