Satara Curfew : सातार्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे रविवारी रात्री उशीरा दोन गट भिडले. समाज माध्यमांवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून रविवारी जाळपोळीची घटना घडली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे हा प्रकार रात्री उशिरा घडला. या घटनेत दोन युवकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन गट आपसांत भिडले आणि त्यातून परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काहींच्या घरावर दगडफेक करण्यात आली, गाड्या रस्त्यावर पाडून मोडतोड झाली, जाळपोळही सुरू झाली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रण आणली. सध्या या परिससातील इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
सोशल मीडियावर एकाने महापुरूषांशी संबंधित एक आक्षेपार्ह पोस्ट केली. त्या पोस्टमुळे महापुरूषांचा अवमान होत असल्याचा दावा दुसऱ्या गटाकडून करण्यात आला. या घटनेमुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली. मालमत्तेची तोडफोड केली. या घटनेमुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली. तसेच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या पोस्टवरून गेल्या दोन-चार दिवसांपासून गावातील वातावरण धुमसत होते. या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली होती. पण, रविवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आणि त्यातून परिस्थिती चिघळली. मात्र आता पोलिसांनी पुन्हा हस्तक्षेप करत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.