लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने मतदारांची उत्सुकता.. उमेदवारांची हुरहुर अन कार्यकर्त्यांची ईर्ष्या ओसंडून वाहताना पहायला मिळाली. शुक्रवारी संपूर्ण दिवस निवडणूक लागलेल्या गावांमध्ये एकच धावपळ पहायला मिळाली.
जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला व पुरुष मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्या. एकूण नऊ लाख ८४ हजार ८६२ मतदारांपैकी सुमारे सात लाख ४८ हजार ४९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रांवर संपूर्ण दिवस मतदारांनी रांगा लावल्या होत्या. निवडणूक विभागातर्फे केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मास्क लावलेल्या मतदारांनाच मतदान केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मतदान केंद्रासह १०० मीटर अंतरामध्ये पोलीस बंदोबस्त पहायला मिळत होता.
सातारा तालुक्यात ८० टक्के मतदान झाले. ९७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक लागलेल्या १३० ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ९० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. यामध्ये कोडोली, अंगापूर, अतित, तासगाव, नांदगाव, शिवथर, वनगळ, नुने, सैदापूर, चिंचणेर वंदन, गोवे या गावांमध्ये चुरस पहायला मिळाली.
एका वॉर्डात तीन जागांसाठी ७ ते ८ उमेदवार उभे असल्याने सर्व उमेदवार मतदारांच्या घराभोवती घुटमळताना पहायला मिळत होते. अनेक उमेदवारांच्या चेहऱ्यावर शंकांचे काहूर पहायला मिळत होते. कार्यकर्ते ईर्ष्येने मतदारांना वाहनाने मतदान केंद्रांजवळ आणून सोडत होते, तर मतदारांनी आपल्यालाच मतदान केले की दुसऱ्या उमेदवाराला याची हुरहुर स्पष्टपणे उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसली. लोकशाहीच्या मोठ्या सोहळ्यात नवमतदारांमध्ये तर प्रचंड उत्सुकता पहायला मिळाली. वयोवृद्ध मतदारांनीही काठीचा आधार घेत मतदान केंद्रांवर गर्दी केलेली होती.
हिंगणगावात एक तास मतदान थांबले
फलटण तालुक्यातील हिंगणगावात तब्बल एक तास मतदानप्रक्रिया थांबली होती. नवीन मशीन बसवून त्या ठिकाणी मतदानप्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर मतदान कर्मचाऱ्यांसोबतच स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसली. अनेक ठिकाणी कार्यकर्ते मतदानप्रक्रियेत हस्तक्षेप करत होते.
उमेदवार, कार्यकर्त्यांची घुसखोरी
ग्रामपंचायतीसाठी उभ्या असलेल्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक मतदान केंद्रांवर घुसखोरी केल्याचे पहायला मिळत होते. सकाळच्या वेळेत अनेक ठिकाणी उमेदवारच मतदान केंद्राबाहेर बसून होते. पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ते निघून गेले.
उडतारे, बावधन, कोडोली ग्रामपंचायतीत दोन्ही गटांची चुरस
वाई तालुक्यातील उडतारे, बावधन तसेच सातारा तालुक्यातील कोडोली या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांना घरातून मतदान केंद्रांवर आणण्यासाठी चुरस पहायला मिळाली. या ग्रामपंचायतींमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. उलट्यासुलट्या आघाड्यादेखील झाल्या आहेत. आता मतदारांनी या आघाड्यांना स्वीकारले की धक्का दिला हे मतदानानंतर पुढे येणार आहे.
शिंदी ग्रामपंचायतीत अवघे नऊ मतदान
माण तालुक्यातील शिंदी या ग्रामपंचायतीमध्ये एक जागा वगळून इतर सर्व जागा बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामस्थांनी एकत्र येऊन राहिलेला उमेदवारी अर्जदेखील काढून घेण्याचे ठरले. मात्र उमेदवाराने अर्ज कायम ठेवला. शुक्रवारी या ग्रामपंचायतीत संबंधित उमेदवारासह इतर आठ मतदारांनी मतदान केले. इतर मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत.
मतदारांना आणण्यासाठी एसी गाड्या
मतदारांना मतदान केंद्रावर आणणे व घरी सोडण्यासाठी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांनी वाहनांची सोय केलेली होती. पूर्वी रिक्षा पहायला मिळत होत्या. आता त्याच ठिकाणी हायफाय एसी गाड्याही मतदारांच्या दिमतीला ठेवण्यात आल्याचे पहायला मिळाले.