इतिहास संवर्धनाच्या चळवळीतील ‘जिज्ञासा’
सचिन काकडे
सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कालौघात लुप्त होत चाललेला हा वारसा दृष्टिक्षेपात आणण्याचं महत्त्वाचं काम केलं ते जिज्ञासा मंच या संस्थेनं. इतिहास संकलनापासून सुरू झालेला हा प्रवास संवर्धनाचा टप्पा ओलांडून आता जनजागृतीपर्यंत येऊन थांबलाय. मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून इतिहासात मानाचं स्थान मिळविलेल्या सातारा शहरात सुरू झालेली ‘जिज्ञासा’ची चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे.
सातारा शहराला इतिहासाची किनार आहे. या शहराच्या आसपास अनेक ऐतिहासिक वास्तू विखरून पडल्या आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने साताऱ्यातील इतिहासप्रेमी तरुणांनी एकत्र येत १९९५ रोजी ‘जिज्ञासा मंच’ हा ग्रुप सुरू केला. प्रारंभी जवळपास तीस तरुण या ग्रुपशी जोडले गेले. या तरुणांनी सुरुवातीला गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली आणि तिचा प्रारंभ केला तो ती किल्ले अजिंक्यताऱ्यावरून. ‘मेलेले मुडदे का उकरताय.. दगड-धोंडे उकरून काय मिळणार’ अशा शब्दांत अनेकांनी ‘जिज्ञासा’च्या सदस्यांवर प्रहार केले. मात्र तरुणांचे काम काही थांबले नाही. अजिंक्यताऱ्यावर राबविलेली संवर्धनाची मोहीम महाराष्ट्रातील पहिली मोहीम होती. ही मोहीम सलग पाच वर्षे चालली. ग्रुपचे सदस्य दर शनिवारी सकाळी सात ते पाच या वेळेत किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत होते. या मोहिमेपासूनच ‘जिज्ञासा’ची चळवळ अधिक समृद्ध व व्यापक होत गेली.
अजिंक्यतारा मराठा साम्राज्याची राजधानी होती. या राजधानीच्या प्रवेशद्वारावरील लाकडी दरवाजा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वारसा जतन करण्यात ‘जिज्ञासा’ने मोलाची भूमिका बजावली. या लाकडी दरवाजावर आपल्याला आजही शिलालेख आढळून येतो.
आज आपण कोणत्याही वस्तूचा फोटो सहजरीत्या काढू शकतो. तो संकलित करून ठेवू शकतो; परंतु वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. ‘जिज्ञास’ने सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जवळपास सात हजार फोटो कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढले. या सात हजार वास्तूंपैकी जवळपास तीन हजार वस्तू आज नामशेष झाल्या असून, त्या केवळ फोटोंच्या रूपात आपल्याला पहायला मिळतात. ‘जिज्ञासा’ने सुरू केलेल्या अजिंक्यतारा जतनीकरण मोहिमेला पुढे चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये जनजागृती झाली. तरुणाई गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढे सरसावली आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात गड-किल्ले संवर्धनाची चळवळ सुरू झाली आहे.
(चौकट)
संकलन, संवर्धन अन् जनजागृती...
जिज्ञासाने गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत ६० ते ७० शिलालेख शोधून काढले, ताम्रपट, विरगळांचा शोध लावला, अनेक ऐतिहासिक वास्तू दृष्टिक्षेपात आणल्या त्याचे संवर्धन केले. व्याख्यानमाला, संग्रहालय दिन, हेरिटेज वॉक असे कार्यक्रम ‘जिज्ञासा’कडून सातत्याने राबविले जात आहेत. काहीतरी नवीन शोध घेण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या ‘जिज्ञासा’चे काम आता इतिहास संकलन, संवर्धनापासून जनजागृतीपर्यंत पोहोचले आहे.
फोटो देत आहे.