सांगली : लोकसभेच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सांगली व हातकणंगले मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून आता उमेदवारांनीही देव पाण्यात घातले आहेत. पैजा व सट्टाबाजारही जोरात चालू झाल्याने सर्वांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे. अपराजित राहिलेल्या काँग्रेसच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात प्रथमच इतकी चुरस निर्माण झाली आहे. विजयाबाबत कोणालाही ठामपणे दावा करता येऊ नये, इतपत काट्याची लढत या मतदार संघात झाली आहे. त्यामुळे दुतर्फा पैजांना पूर आला आहे. निकालाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. काँग्रेसचे उमेदवार केंद्र्रीय मंत्री प्रतीक पाटील व भाजपचे संजय पाटील यांच्यातील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्र्रीय मंत्री म्हणून प्रतीक पाटील यांच्यासह वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी जोरदार ताकद लावली आहे. दुसरीकडे संजय पाटील यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांबरोबरच खुद्द पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प्रचारात भाग घेतल्याने, भाजपच्यादृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या दोन्ही उमेदवारांशिवाय आम आदमी पार्टी, जनता दल व काही अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंगत आणली आहे. या सर्व उमेदवारांना किती मते मिळणार आणि त्याचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार, यावरूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. येत्या १६ मे रोजी निकाल लागणार असल्याने उमेदवारांनी देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांचे कुटुंबीय व कट्टर समर्थकांकडूनही नवस बोलले जात आहेत. मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी कुलदैवतासह मोठमोठ्या देवस्थानांना, तीर्थस्थळांना भेटी देऊन विजयासाठी साकडे घातले होते. प्रचारादरम्यान जशा फेर्या झाल्या, तशी देवाकडेही आता दुसरी फेरी काहींनी पूर्ण केली. देवाला साकडे घालताना ज्योतिषांच्या दरबारीही उमेदवार भेटी देत आहेत. एक, दोन नव्हे, तर अनेक ज्योतिषांकडून विजयाची आणि भविष्याची खातरजमा करण्यात उमेदवार गुंग आहेत. ग्रहांची स्थिती आणि अंकशास्त्राची जुळवाजुळव करून, आपल्याला विजय कसा मिळू शकतो, याबाबत चौकशा सुरू आहेत. काट्याच्या लढतीमुळे या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर पैजा व सट्टा लागला आहे. लाखो रुपयांचा डाव निकालावर खेळला जात आहे. एकूणच निकालापूर्वी राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. (प्रतिनिधी)
उत्सुकता शिगेला, उमेदवारांचे देव पाण्यात!
By admin | Published: May 13, 2014 12:41 AM