सातारा : जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना चलन पुरवठा होत नसल्याने त्यांच्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार रुपये २ हजार पाचशे ते १० हजार रुपयांपर्यंतच रक्कम द्यावी लागते. त्यामुळे ग्राहकांबरोबर वादावादीचे प्रसंग सातत्याने सहकारी बँकांमध्ये घडत आहेत. याबाबत त्वरित लक्ष घालून नागरी सहकारी बँकांना आवश्यकतेनुसार कर्जपुरवठा व्हावा, असे निवेदन सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. करन्सी चेस्ट असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने चलन पुरवठा होतो. करन्सी चेस्टकडून सर्व बँकांना समप्रमाणात चलन पुरवठा होणे आवश्यक असताना सहकारी बँकांना सापत्न भावाची वागणूक दिली जाते. चलन पुरवठा करताना राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य व त्यानंतर खासगी बँका व शेवटी सहकारी बँका यामुळे नागरी सहकारी बँकांचे खातेदार त्रस्त झाले आहेत.सहकारी बँकांच्या दैनंदिन व खासगी बँकांच्या खातेदारांना आठवड्याला रुपये २४ हजार दिले जातात. परंतु करन्सी चेस्टकडून होत असलेल्या मनमानीला पायवड व्हावा यासाठी सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल देसाई, उपाध्यक्ष हणमंतराव ज्ञानू पाटील, संचालक संदीप चौगुले, कार्यलक्षी संचालक संजय अष्टपुत्रे व सचिव चंद्रकांत खुडे, तसेच कऱ्हाड जनता बँकेचे उपाध्यक्ष विकास धुमाळ, अजिंक्यतारा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जाधव, जनता बँकेचे व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, शिवनेरी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जनार्दन शिंदे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप चौधरी, गौरव निकम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) बँका अडचणीत...छोटे व्यापारी, पेन्शनर, भाजीवाले, फळविक्रेते, लहान व्यावसायिक अशा ग्राहकांना बँकिंग सेवा देण्याचे काम सहकारी बँका करीत असतात. अशा खातेदारांचे अनेकवेळा राष्ट्रीयकृत बँका अगर खासगी बँकांमध्ये खाते देखील नसते. अशा लोकांना सेवा देताना बँकांना अनेक अडचणी येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
चलन देता का चलन... सहकारी बँकांचा टाहो !
By admin | Published: December 21, 2016 11:49 PM