xसातारा : पोवई नाक्याजवळ हाकेच्या अंतरावरील मराठी यूनियन स्कूलच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी काहीजणांनी झाडाला आग लावली. मात्र, झाडाच्या बुंध्याजवळ भडकणारी आग दिसताच काही रिक्षा चालकांनी पाणी आणि मातीच्या साह्याने आग विझविली. आग कोणी लावली, याबाबात विचारणा होऊ लागल्यानंतर संबंधितांनी तेथून धूम ठोकली. पोवई नाक्यावरून शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या या मार्गावर मराठी यूनियन स्कूलच्या प्रांगणात अनेक वर्षांपासून विविध जातींचे झाडे आहेत. शाळेची संरक्षण भिंत नसल्याने दिवस रात्र या ठिकाणी काही युवकांचा वावर वाढला आहे. रात्री-अपरात्री मद्यपींनी येथे अड्डा बनविला आहे. यामुळे या परिसराला कोणी वाली आहे की नाही, असा समज झाला आहे. या ठिकाणी जळणासाठी मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. अनेक झाडांची सालीही काढल्या आहेत, यामुळे झाडांचे आयुष्य कमी झाले आहे. अशातच आता ही झाडे नष्ट करण्याचा सपाटा काहींनी लावला आहे. झाडे मुळापासूनच तोडण्यासाठी जाळ लावण्यात येऊ लागले आहेत.गुरुवारी झाडाला लावण्यात आलेली आग पाहून रिक्षा चालकांनी सतर्कता दाखवून आग विझविली; परंतु अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी सदर बझार रिक्षा थांबेधारक आता असे कोणी कृत्य करत असेल त्यावर गुन्हा दाखल करणार असून या ठिकाणी जातीने लक्ष ठेवले जाणार असल्याचे या थांब्यावरील सर्वच रिक्षा चालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळत नाही. यासाठी अनोखी शक्कल लढविली जात आहे. झाडाच्या बुंद्याजवळ आग लावून ठेवली तर झाड हळूहळू आतून जळत जाते व दहा ते पंधरा दिवसांतच कोसळते. त्यामुळे झाडाला कीड लागून पडले, असा समज करून झाडे तोडण्याचा सपाटा सुरू आहे. अशा प्रकारे हजारो झाडे या पद्धतीने जाळून नष्ट केली आहेत. तरी देखील वनविभाग कारवाई करत नाही. यावर वेळीच आवर घालावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.मानवी वस्तीसाठी एकीकडे हजारो झाडांंची कत्तल केली जात आहे. त्यामुळे निसर्गावर विपरीत परिणाम झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ४०-४२ वर पारा गेला आहे. शासनानेही याची गंभीर दखल घेत मागीलवर्षी २ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उपक्रम हाती घेतले होते. मात्र, दुसरीकडे अशा काही लोकांकडून मोठी वृक्ष जाळून तोडण्याचा कृत्य अजूनही सुरू आहे. त्यामुळे वन विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)शाळेच्या पाठीमागून काढला पळ !या झाडाला लावलेल्या आगीत झाडाचा बुंधा सहा इंच खोल जळाला आहे. ही आग एका व्यक्तीसह दोन मुलांकडून लावली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रिक्षाचालक याठिकाणी येताच त्यांनी शाळेच्या पाठीमागून पळ काढल्याचे रिक्षाचालक मुस्ताक शेख व ससेकाका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रिक्षाचालक करणार झाडांचे संरक्षण..पोवई नाक्यावरून शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाका ते सदर बझार या ठिकाणी विनापरवाना झाडे तोडणे अथवा जाळणे, असे कृत्य कोण करत असेल तर रिक्षाचालक संबंधितांवर गुन्हा दाखल करणार, तसेच या मार्गावर सर्वच झाडांचे आम्ही येता जाता लक्ष ठेवणार असल्याचे रिक्षाधारकांनी सांगितले.
महाकाय झाड जाळण्याचा कट उधळला !
By admin | Published: March 31, 2017 10:59 PM