सातारा : दूर अंतरावरून शाळेत पायपीट करत येणाऱ्या मुलींचा प्रवास सुखावह व्हावा यासाठी साताऱ्यात शाळकरी मुलींसाठी सायकल बँक तयार करण्यात आली आहे. सहयोग विकास भारती या संस्थेने हा पुढाकार घेतला असून राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील ६ मुलींना सायकल भेट देण्यात आली.या उपक्रमाचा सहयोग विकास भारती संस्थेचे अध्यक्ष सुभाष दोशी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारत भोसले, प्रा. डॉ. मिरा दीक्षित, अनिल वाळिंबे, माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, अनिल काटदरे, डॉ.सुधीर जोशी, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या सीमा दाते, रामचंद्र रेवाळे, शालाप्रमुख एस. एस. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना सुभाष दोशी यांनी शाहूपुरी येथील विद्यार्थ्यांसाठी सायकल बॅंकेची जी सुविधा उपलब्ध करून दिली तिचा विद्यार्थ्यांनी उत्तम रितीने लाभ घेऊन शैक्षणिक संधीचे सोने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.भारत भोसले यांनी याप्रसंगी सहयोग विकास भारती संस्था या संस्थेने शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल बॅंकेची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त करुन भविष्यात हे विद्यार्थी आपल्या अपेक्षेप्रमाणे शैक्षणिक प्रगती साधून आपला विश्वास सार्थ ठरवतील अशी ग्वाही दिली.
पायपीट थांबणार, साताऱ्यात शाळकरी मुलींसाठी सायकल बँक!
By प्रगती पाटील | Published: September 14, 2023 2:35 PM