सातारा : वरातीत नाचण्याच्या कारणावरून विकास पवार (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा खून केल्याप्रकरणी डबेवाडी, ता. सातारा येथील दोन युवकांना जिल्हा न्यायाधीश-१ ए.ए.जे. खान यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अभिजित बबन पवार (वय २९), सागर मारूती कार्वे (वय ३०, रा. डबेवाडी, ता. सातारा) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, डबेवाडी येथे १२ जून २०१४ रोजी लग्न सोहळा होता. हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी गावातून वरात निघाली होती.
या वरातीमध्ये नाचताना एकमेकांचा धक्का लागला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास वरात संपल्यानंतर विकास पवार हा आपल्या अन्य मित्रांसोबत दुचाकीवरून साताऱ्यात येत होता. त्यावेळी डबेवाडी येथील एका पत्र्याच्या शेडजवळ पाठीमागून आलेल्या अभिजित पवार, सागर कार्वेसह त्यांच्या अन्य साथीदारांनी विकास पवारवर गुप्ती, लाकडी दांडक्याने हल्ला चढविला. विकासच्या डाव्या छातीवर व इतरत्र गुप्तीचे वार वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी विकाससोबत असलेला त्याचा मित्र वसंत गायकवाड याच्यावरही गुप्तीने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकूण आठजणांवर गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने अभिजित पवार आणि सागर कार्वे या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तर इतर सहाजणांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.विशेष सरकारी वकील संतोष भोसले, एन. डो. मुके यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे वाघ, शुभांगी भोसले यांनी सहकार्य केले.