सागर गुजर ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आखलेली रणनीती अचाट ठरली आहे. या रणनीतीवर बेहद्द खुश झालेल्या आमदार अजित पवारांचे तर त्यांनी मनच जिंकले आहे. बुधवारी कर्मवीरांना अभिवादन कार्यक्रमात तर शिवेंद्रसिंहराजेंनी हातातील घड्याळ काढून अजितदादांना काटे फिरवून दाखवले. या कृतीचा नेमका उद्देश काय? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल यात्रेच्या साताऱ्यात झालेल्या सभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘आयते ताट कुणाला देणार नाही,’ असे स्पष्टीकरण केले होते. मनोमिलनावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अनेकदा पाठराखण केल्याचे प्रसंग राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्मरणात अजूनही आहेत.
अजित पवार व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात नेहमीच शितयुध्द सुरु असते. शिवेंद्रसिंहराजेंनी आक्रमक होत उदयनराजेंशी पंगा घेतल्याने अजित पवार यांचे त्यांच्यावर विशेष सख्य जडले आहे. खासदार शरद पवार यांनीही माण तालुक्यातील दुष्काळ दौºयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बोलावून घेतले होते. पवार घराणे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर इतके का ‘फिदा’ आहेत? याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत.सातारा पालिकेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आक्रमक बाणा सर्वांनाच वेधत आहे. राष्ट्रवादी पक्षात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे यांच्या शब्दाला जो मान आहे, तोच मान आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही मिळविला आहे.आक्रमक आणि स्पष्टवक्तेपणा या दोन गोष्टींमुळे राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छाप टाकली आहे.व्यासपीठावर येऊन बसण्याचा आग्रह...‘रयत’च्या व्यासपीठावर मोजक्याच वेळी राजघराण्यातील मंडळी पाऊल ठेवतात, हे आत्तापर्यंतचे चित्र होते. कर्मवीरांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीची मोठी फळी रयत शिक्षण संस्थेत हजर होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही या कार्यक्रमासाठी आले होते. परंतु ते व्यासपीठावर न जाता इतर नेत्यांसोबत भारतीय बैठक मांडून बसले होते, त्यांना अजित पवारांनीच व्यासपीठावर बोलावले.