सातारा : ''सातारा जिल्हा पोलीस दलाने वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी केले आहे. तसेच गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर गेले आहे. हे काम अभिनंदनीय असून, जिल्ह्यातील टॉपटेन गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. या गुन्हेगारांना मोक्काअंतर्गत कठोर कारवाईची सूचना केली आहे. तसेच जिल्ह्यात दादागिरी खपवून घेणार नाही,'' असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
सातारा तालुका पोलीस ठाणे परिसरातील शिवतेज हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा पोलिसांच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ''वर्षभरात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे, तर सातारा पोलिसांची कामगिरी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चांगली झाली आहे. दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी गर्दी, मारामारी, दुखापत आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे शाबितचे प्रमाण २०१९ मध्ये ३५.५ टक्के होते. २०२० मध्ये हे प्रमाण ५९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी फरार आणि वाँटेड अशा ११९ जणांना पकडण्यात आले. टॉप टेन गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्याची सूचना केली आहे.
चौकट :
ग्रेड सेपरेटर उद्घाटनाबाबत तक्रार नाही...
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरच्या झालेल्या उद्घाटनासंदर्भात गृहराज्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, उद्घाटन झाल्याचेही मला माहिती नव्हते. याबाबत आतापर्यंत कोणीही तक्रार दिलेली नाही. तक्रार येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे सांगत मंत्री देसाई यांनी अधिक भाष्य करणे टाळले.