पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी चार दिवसांपासून महाराष्ट्राचा केंद्रबिदू ठरली आहे. पोलिसांनी संचारबंदी शिथिल करून दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला पुसेसावळीकरांनी साथ दिली. जनजीवन पूर्व पदावर आले आहे. मात्र, पाचव्या दिवशीही पोलिस तळ ठोकून आहेत.पुसेसावळी येथे तणावपूर्ण शांतता असली तरी येथील ग्रामस्थ भयभीत असल्याचे चित्र आहे; परंतु शाळा, महाविद्यालये, सर्व दुकाने सुरू असल्याने बाजारपेठ खुली आहे, पण दुकानात ग्राहकांची वर्दळ कमी जाणवत आहे. या परिस्थितीवर मात करून पुसेसावळीतील जनजीवन सुरळीत करण्यासाठी पुसेसावळी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाची धडपड सुरू आहे.काही दिवसांत गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद हे सण येत आहेत. समाजात सलोखा निर्माण व्हावा व हे सण शांततेत पार पडावेत यासाठी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पोलिस पुसेसावळीत ठाण मांडून आहेत. पुसेसावळी ही मोठी बाजारपेठ असल्याने आजूबाजूंच्या गावांशी कायम संपर्क येत असल्यामुळे राजाचे कुर्ले, थोरवेवाडी, पारगाव, गोरेगाव, वडगाव, चोराडे, रहाटणी, कळंबी, वडी, त्रिमली, येळीव, उंचीठाणे, कळंबी, लाडेगाव, रेवली, वजारवाडी गावांतील ग्रामस्थांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे दुकानांमध्ये ग्राहकांची रेलचेल थोड्या प्रमाणात कमी दिसत आहे; परंतु अजून तीन-चार दिवसांत पूर्णपणे पुसेसावळी बाजारपेठ पूर्ववत होईल, अशी आशा परिसरातील ग्रामस्थांना आहे.व्यवहार सुरू करण्याची इच्छालोकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची इच्छा आहे; परंतु पुन्हा अनुचित प्रकाराची भीती व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी अजून दुकाने उघडलेली नाहीत.शाळा-महाविद्यालये सुरूचार दिवसांनंतर महाविद्यालये व शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी शिक्षण विभागाने घेतली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Satara: पुसेसावळीत बाजारपेठ खुली; जनजीवन सुरळीत; पण..
By दीपक शिंदे | Published: September 16, 2023 11:31 AM