सातारा : येथील नकाशपुरात १४ वर्षीय शाळकरी मुलाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी तीन रुग्ण संशयित म्हणून आढळले असल्याने पालिकेने याची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत.जयद अस्लम शेख (वय १४, रा. नकाशपुरा पेठ, सातारा) असे डेंग्यूची लागण झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जयद हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. घरातल्यांनी त्याला साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.
दरम्यान, आणखी तिघांना डेंग्यूचे संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नकाशपुरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याचे समजताच पालिकेने याची तत्काळ दखल घेऊन परिसरात औषध फवारणी केली. तसेच स्वच्छता मोहीम हाती घेतली. नगरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.