शामगाव : कटावणीने दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला सुरा लावत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील चार तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून ते पसार झाले. अंतवडी येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली.
अंतवडी येथील मारुती जगन्नाथ शिंदे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून काही अंतरावर पत्नी लीलाबाई यांच्यासमवेत राहतात. शिंदे दाम्पत्याला बंडा नामक मुलगा असून, तो मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहे. त्यामुळे पत्नी, मुलांसह तो तेथेच वास्तव्याला आहे. वर्षातून एक-दोन वेळाच तो गावी अंतवडी येथे येतो. एरव्ही मारुती व लीलाबाई हे दोघेच घरी असतात. गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर ते दोघेही झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कटावणीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
दरवाजा तोडताना मोठा आवाज आल्यामुळे मारुती शिंदे यांना जाग आली. ते अंथरुणावरच उठून बसले. तसेच कोण आहे, अशी त्यांनी विचारणा केली. त्यावेळी दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी मारुती शिंदे यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या मानेवर सुरा ठेवला. आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची त्यांना धमकी दिली. मारुती शिंदे हे भीतीने गप्प बसल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावली. एक चोरटा मारुती यांच्या मानेवर सुरा ठेवून तसाच उभा राहिला तर इतरांनी घरात शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, यावेळी झालेल्या गोंधळामुळे मारुती यांच्या पत्नी लीलाबाई यांनाही जाग आली. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांनाही धमकावले. दोघांनाही ठार मारण्याची त्यांनी धमकी दिली. चोरट्यांनी लीलाबाई यांच्या कानातील सोन्याची कर्णफुले, गळ्यातील बोरमाळ, मंगळसूत्र काढून घेतले. तसेच त्यांच्यासमोरच कपाटाचा दरवाजा कटावणीने तोडून त्यातील दागिने घेतले. इतर शोधाशोध करताना त्यांनी घरातील साहित्य इतरत्र विस्कटले. त्यानंतर घरातून बाहेर पडताच एका दुचाकीवरून चोरटे पसार झाले.चोरटे निघून गेल्याची खात्री होताच मारुती आणि लीलाबाई शिंदे यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. घटनेची माहिती मिळताच काही युवकांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
याबाबतची माहिती मसूर पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी व कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबतची नोंद उंब्रज पोलिसांत झाली आहे.
- अंतवडी येथे मारुती शिंदे यांच्या घरात घुसलेले चोरटे मराठीत बोलत होते. तसेच तिघेजण होते, असे शिंदे दाम्पत्याने पोलिसांना सांगितले आहे. तिघांनीही तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांचे चेहरे पाहता आले नसल्याचेही ते म्हणाले. चोरी केल्यानंतर ते तिघे एकाच दुचाकीवरून निघून गेले. अंधार असल्यामुळे दुचाकीचा क्रमांकही दाम्पत्याला पाहता आला नाही.
अंतवडी, ता. क-हाड येथे मारुती शिंदे यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य इतरत्र विस्कटले. (छाया : बाळकृष्ण शिंदे)
मायणीत चार बंद घरे फोडली एलईडी टीव्ही अन् रोख रकमेसह सोन्या-चांदीचे ऐवज लंपासमायणी : येथील श्रीराम कॉलनी परिसरात असलेली चार बंद घरे फोडून त्या घरातील एलईडी टीव्ही व रोख रकमेसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार बंद पडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मोराळे रोड व मरडवाक रोड परिसरात असलेले श्रीराम कॉलनीतील प्रा. शिवशंकर माळी यांचे बंद घर फोडून घरातील एलईडी टीव्ही व कपाटातील साहित्य विस्कटले. इतर ऐवज लंपास केला. तसेच प्रा. विलास बोदगिरे यांच्या घरातील साहित्य कपाटातील साहित्य विस्कटून रोख रकम लंपास केली.फल्ले कॉलनीतील सुनील फल्ले यांचेही बंद पडून घरातील एलईडी टीव्ही, सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. या परिसरात असलेले श्रीकर देशमुख यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील एलईडी टीव्ही, दागिने व रोकड लंपास केली.एकाच रात्री चार ठिकाणी या घटनेची नोंद करण्याचे काम मायणी पोलीस दूरक्षेत्रामध्ये सुरू असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी करीत आहेत.